पुणे तिथे काय उणे !
असे म्हणतात की जर आपण एखाद्या शहरात आपल्या आयुष्याचा बहुतांश वेळ घालवला तर ते शहर आपल्याला जगाच्या पाठीवर सर्वांत बेस्ट शहर आहे असे वाटते. त्याची तुलना आपण कुठल्याही शहराशी करायला तयार होत नाही. माझेदेखील असेच काही मत आहे, ते म्हणजे पुण्यासाठी. सर्व गुण संपन्न असलेले हे शहर आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या शहराची वाटचाल आज मेट्रो सिटीच्या दिशेने होत आहे. एकेकाळी "पेन्शनर्स पॅराडाईज" म्हणून विख्यात असलेले पुणे आज "आयटी हब" आणि "ऑटोमोबाईल हब" म्हणून ओळखले जात आहे.
पुणे हे दक्खनच्या पठारावरील एक ऐतिहासिक शहर पुनवडी नावाने प्रसिद्ध होते. सभोवताली असलेल्या टेकड्या आणि दोन नद्यांनी सुजलाम झालेल्या पुण्यावर निसर्गाने देखील भरभरून उधळण केली आहे. पेशवाई आल्यानंतर पुणे समृद्धीच्या दिशेने धावू लागले. सतरा पेठा असलेलं पुणं एका सुनियोजित शहराचे उत्तम उदाहरण झाले. पेशवाई बांधकाम शैली पुण्यातल्या वड्यांवर ठळकपणे उमटून दिसते. शनिवारवाडा आणि विश्रामबागवाडा हे पुणेरी बांधकाम शैलींचे उत्तम नमुने आजही पंच-तारांकित हॉटेल्सच्या इंटिरियर्सना इन्स्पायर करतात.
मी पुण्यात शिक्षणासाठी २०१२ साली आलो आणि इथल्या प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली पाहायला लागलो. हळूहळू पुणे एक्स्प्लोर करता करता मीही "पॅशनेट पुणेकर'' झालो. सुदैवाने मला पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुरुवार पेठेत राहण्याचे सौभाग्य लाभले. त्यामुळे टिपिकल पुणेरी लाईफस्टाईल अनुभवता आली. ती जगण्यास सुरवात झाली ती पहाटे उठून सायकलवर पर्वती-सारस बागेत जाण्यापासून. दररोज सकाळी सायकलिंग करत पुणे दर्शन नित्याचे होत गेले. मग जोशी वडेवाले, वैशाली चा मैसूर डोसा, कैफे गुडलक ची बन-मस्का चाय स्वाभाविकच जिभेचे चोचले पुरवू लागले. साबुदाणा वडा असो की बटाटा वडा, एक्स्ट्रा कोशिंबीर हट्टाने मागू लागलो. रस्त्यात मध्येच बंद पडणारी पीएमटी बस चा खडतर प्रवास उबेर-ओला कॅब पेक्षा जास्त थ्रीलिंग वाटू लागला. रिक्षावाल्यांशी सुट्टे पैशांवरून शाब्दिक हुज्जत घालणारे पुणेकर मनोरंजक वाटू लागले. कलेची आवड देखील पुण्यापासून सुरु झाली, मग सवाई गंधर्व महोत्सव आणि पुणे फेस्टिवल न चुकता अटेंड करू लागलो. बालगंधर्व नाट्यमंदिरावर हँगआऊट करू लागलो. सिनेमाचा आनंद मल्टिप्लेक्स पेक्षा प्रभात, मंगला, निलायम आणि लक्ष्मी नारायण च्या स्टॉल सीट वर येऊ लागला. गणपतीचे दहा दिवस म्हणजे जणू पुणे कार्निव्हलच. पुण्यात सबंध महाराष्ट्र लोटल्याचा अनुभव यायचा. शॉपिंग ची मजा कॅम्पमधल्या शनिवारच्या ट्रॅफिक विरहित "वॉकिंग प्लाझा" पेक्षा दुसरीकडे कदाचित अनुभवताच येणार नाही. डोळ्यांची पारणे फेडणारी लक्ष्मी रोड ची लखलखाट कदािचत न्यू यॉर्कच्या वॉल स्ट्रीट समोर फिकी पडेल.
पुण्याचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे इथली सामाजिक बांधिलकी. पुण्यात विविध जाती-धर्मांचे लोक सुखाने नांदतात. हिंदू, मुस्लिम, शिख बांधवांप्रमाणेच पारसी,ईरानी आणि यहुदी लोकांनादेखील पुणे आपलेसे वाटते. डेविड ओहेल सिनॅगॉग हे त्याचे उत्तम उदाहरण. लाखो परदेशी पर्यटक ओशो आश्रमास भेट देतात. यामुळे पुणे खऱ्या अर्थाने एक कॉस्मोपॉलिटन शहर झाले आहे. मऱ्हाटमोळी परंपरा आजही पुण्याने जपली आहे. मराठी संस्कृती पुण्यात प्रकर्षाने जाणवते.
दर्जेदार शिक्षण क्षेञात पुणे नेहमीच आघाडीवर राहीले आहे. विद्येचे माहेरघर किंवा ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशा व्याख्यांनी पुणे संबोधले जाते. पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्याबरोबर सिम्बायसिस सारखी अभिमत विद्यापीठे पुण्यात स्थापन झाली आणि ज्ञानगंगा पुण्यात वाहू लागली.
जुने पुणे आता हायटेक होऊ पाहत आहे. आयटी पार्कस् नी शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. पुण्याला वेस्टर्न टच लागतोय. नाईट लाईफ पुणेकरांच्या जीवनशैलीत रुजू लागली आहे.पाश्चात्य जीवनशैली असलेल्या कोरेगाव पार्क, विमाननगर सारख्या उच्चभ्रु वस्ती विदेशी नागरीक पुण्यात राहाण्यासाठी निवडतात. सुसज्ज मॉल्समुळे जागतिक दर्जाचीे उत्पादने पुण्याच्या पुढ्यात येऊन पडले आहेत. लवासा, अमनोरा, मगरपट्टा सारख्या क्लस्टर टाऊनशिप्स पुण्यात साकारल्यामुळे गृहनिर्मिती क्षेत्राला उत्तम मापदंड मिळाले आहे. मॅरियट, वेस्टिन सारख्या आलिशान हाँंटेल्स पुणेकरांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. विदेशी पर्यटकांना पूरक सोयीसुविधा देण्यासाठी पुणे सज्ज झाले आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा आणि भविष्याचा वेध पुण्याने अचूक वेधले आहे. कदाचित प्रगतीचे हेच टॉनिक पुणे पीत आहे. पूर्ण भारतातील तरुण आज पुण्याकडे आकर्षित होत आहे.
पाश्चात्य संस्कृतीसाठी इतके पोषक वातावरण असताना देखील पुण्याने आपल्या संस्कृतीशी नाळ जुळवून ठेवली आहे हे महत्त्वाचे. पुण्यात आजही महाराष्ट्र दर्शन घडते. विकासाचे आणि संस्कृती जतनाचे उत्तम मॉडेल म्हणजे पुणे. अशा या सर्व गुण संपन्न पुण्य नगरीबद्दल आवर्जून लिहिण्याचा मोह मला तरी कसा टाळता आला असता ?